Sunday 7 August 2016

पुल-भुल

पुल तुटला, तोल सुटला
पुरात सारे वाहुन गेले
खुप जगायचे होते राव!
पण! जगायचेच राहुन गेले

कस घडल सार ! काय कळलच नाही
चुकला काळजाचा ठोका
दिला काळांन धोखा
सारं आक्रित घडल
थोड विपरीत घडल
ऊरलेले आयुष्य सावित्रीमाईत बुडंल

प्राण कधी गेला कळालच नाही
देह मात्र मुक्तीसाठी तडफडतोय
त्याभोवती मगर,मासे आणि
किडे वळवळतायत

इंग्रजांनी दिलेली धोक्याची घंटा
आमचा मिटेना आपसातील तंटा
जो तो म्हणतोय मीच बडा अन्
चुकाचे खापर दुसर्यावर फोडा

दोष कुणाचा,  चुक कुणाची
यातच भांबावलेत सारे....
अरे! सोडा ती भांडणे
आधी शोधा आम्हाला
आणि सरणावर न्या रे!

शेवटचा पाहु द्या......
या मिटलेल्या डोळ्यांनी
अर्ध्यावर सुटलेला संसार अन्
फुटू द्या श्वासात अडकलेला फुंत्कार

मग बांधा कधीही
तो तुटलेला पुल
पण पुन्हा करू नका
अशी कधीही भुल

तुमच काय? तुमच्या तिजोर्या
भरल्यात राव..अन् जनतेच्या
चुली विझल्यात राव!

          @ अशोक शंकर मटकर